मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
No comments:
Post a Comment